Description
भगवंत कुणाच्या माध्यमातून आणि काय निमित्ताने काय अकल्पनीय करवून घेईल हे गूज त्याचं त्यालाच माहीत. काव्यगीतेची निर्मिती ही असंच एक माझ्याबाबतीत घडलेलं एक अकल्पनीय गूढ आहे. गीता हा विषय घेऊन एक नृत्यनाटिका म्हणजेच बॅले करावा असं मनात आलं. त्यावेळी श्रीमद् भगवद्गीतेवर आधारित मराठी काव्य शोधायचा प्रयत्न केला पण तसं काही मिळालं नाही. शेवटी आपणच श्रीमद् भगवद्गीतेवर मराठीत काव्य करावं असा एक धाडसी विचार मनात आला. 26 वर्षाच्या वेड्या वयाचा परिणाम असेल कदाचित किंवा माझ्या प्रारब्धातील हा सुवर्णयोग प्रत्यक्षात येण्याची वेळ झाली असावी, पण हे शिवधनुष्य उचलण्याचा संकल्प घडला आणि श्रीमद् भगवद्गीतेच्या अंतरंगात शिरलो. सगळ्या चिंतनात बॅले केव्हाच मागे पडला आणि जवळजवळ १६ वर्षांच्या कालावधीत ‘काव्यगीता’ पूर्ण झाली. ऑडिओबुक स्वरूपात २०१५ साली प्रकाशित झालेली काव्यगीता आता पुस्तकरूपात iPustak प्रकाशनाच्या मार्फत येत आहे याचं मनापासून समाधान आहे. हा या काव्यगीतेला सर्व साहित्यप्रेमींचा अनुराग मिळेल या आशेने त्यांच्या हाती ही ‘काव्यगीता’ सुपूर्द करीत आहे.